Hartalika Story Marathi – हरतालिका माहिती आणि कथा


Bybappaadmin

Hartalika Story Marathi – हरतालिका माहिती आणि कथा


Hartalika Story Marathi – हरतालिका माहिती आणि कथा

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड “हरित` म्हणजे “हरण` करणे आणि “आलिका` म्हणजे “आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. 

हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून “हरतालिका` हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.

हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव “पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, “हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. “तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.` 

पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला “अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने “तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.

तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला “पार्वतीपती` असे नामाभिधान पडले. 

इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत. 

रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.

या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात. 

Hartalika Story Marathi – हरतालिका माहिती आणि कथा

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

bappaadmin administrator

    Leave a Reply

    loader