रत्नागिरी: गणेशोत्सव म्हटल्यावर डोळ्यासमोर येते गणपतीची आकर्षक सुबक अशी मुर्ती. आपला गणपती आकर्षक आणि देखणा दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र गणपती सजवट स्पर्धेच्या या गणेशोत्सवात इको फ्रेंडली गणपतीचा विसर आपल्याला पडत चालला आहे. त्यामुळेच रत्नागिरीच्या एका मूर्तीकाराने त्यावर एक पर्याय शोधला आहे.
कोकणात शाडूच्या मातीचे गणपती आपण नेहमीच बघतो, मात्र याच शाडूच्या मातीला पर्याय म्हणून रत्नागिरीतल्या सुशिल कोतवडेकर या मुर्तीकाराने कोकणात मिळणाऱ्या लाल मातीपासून गणेशमुर्ती बनवण्यास सुरूवात केली आहे.
गेली चार वर्ष लाल मातीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचं काम त्यांनी सुरू ठेवले आहे. एक फुटापासून ते तीन फुटांपर्यंत विविध रुपातल्या साडेचार हजारांहून अधिक मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत.
गणेशमूर्तीकार कोतवडेकर हे रत्नागिरीजवळच्या सुफलवाडीत राहतात. गेली अनेक वर्ष ते पिढीजात गणेशमुर्ती घडवण्याचं काम ते करत आहेत. शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणपतीचे दर सध्या चांगलेच वधारले आहेत. त्यालाच एक पर्याय म्हणून लाल मातीपासून गणपती बनवण्याची कल्पना त्यांना सुचली आणि तयार झाले लाल मातीचे गणपती.
पूर्वीच्या काळी याच लाल मातीपासून गणपती तयार केले जात असे. मात्र कालांतराने ती प्रथा बंद पडली, पण सुशील कोतवडेकरांनी ही प्रथा पुन्हा सुरू केली. घरावरची कौलं किंवा मातीची भांडी ज्या मातीपासून बनवतात, ती कोकणातली लाल माती त्यांनी गणेशमुर्ती बनवण्यासाठी वापरली. कोकणात ही माती सहज उपलब्ध असते. इतर मातीपेक्षा ही माती मजबुतीला खुपच चांगली असल्याने, त्यांनी या मातीचा वापर करत मूर्ती साकारण्यास सुरूवात केली.
इतर कुठल्याही मातीपासून बनवण्यात येणाऱ्या मुर्तीपेक्षा निम्या खर्चात ही मुर्ती बनवता येते. एका फुटापासून तीन फुटापर्यतच्या सुबक मुर्ती या कारखान्यात बनवल्या जातात. गणेशोत्सव एक दिवसांवर आल्याने आता मुर्तींचं कामही अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे रंगकाम करण्यात इथले कारागीर सध्या व्यस्त आहेत.
500 रुपये ते 3 हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीला या मुर्तीची विक्री ते करतात. गेल्या वर्षी 500 तर या वर्षी साडेचार हजाराहून अधिक मूर्ती त्यांना घडवल्या आहेत. पूर्ण झालेल्या या गणपतींवर सध्या सुबक रंगकाम आणि त्यावर विविध आभूषणं चढवण्याचं काम सुरु आहे. पर्यावरणपूरक गणपती आपल्या घरी यावा म्हणून अनेक गणेशभक्त त्यांच्या इथले गणपती आपल्या घरी घेऊन जाणार आहेत.
या वर्षी कोतवडेकर यांच्या या लाल मातीच्या गणपतींना संपूर्ण जिल्ह्यातून मागणी आहे. मात्र शाडूच्या मातीपेक्षा या लाल मातीचे वजन अधिक आहे. पण या लाल मातीचे गणपती पाण्यात लवकर विरघळतात. त्यामुळे लाल मातीच्या या गणपतींचा उपयोग खऱ्या अर्थांन पर्यावरणासाठी अधिक होतो.
Baby Ganesha | HD Wallpapers |
Aagman Pictures | Visarjan Pictures |
Fantasy Ganesha | Official Wallpapers |
About the author